शिवरायांचे व्यवस्थापन शास्त्र आजही जगाला मार्गदर्शक- प्रा. संजय खांडवे

 






Ø   सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान

बुलढाणा दि.18 (जिमाका) :   छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक द्रष्टे राज्यकर्ते आणि कुशल व्यवस्थापक होते. स्वराज्याची उभारणी करताना त्यांनी राबवलेली धोरणे आजही आधुनिक व्यवस्थापन शास्त्राला लाजवतील अशी आहेत. शिवरायांचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. संजय खांडवे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसिलदार संजीवनी बोबडे, देशोन्नतीचे जिल्हा संपादक राजेंद्र काळे  आदी उपस्थित होते.

प्रा. संजय खांडवे यांनी आपल्या 'शिवचरित्र' या विषयावरील व्याख्यानातून महाराजांच्या गनिमी काव्यापासून ते त्यांच्या प्रशासकीय शिस्तीपर्यंतचे अनेक प्रसंग उभे केले.  स्वराज्यात सामान्य रयतेचे हित कसे जपले जात असे, याचे दाखले त्यांनी दिले. गड-किल्ले हे आपल्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.  तरुणांनी महाराजांच्या केवळ जयघोष न करता, त्यांचे विचार आचरणात आणून निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला शहरातील वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. खांडवे यांनी आपल्या ओघवत्या भाषेत शिवचरित्रातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या