आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज 10 मार्चपर्यंत करावेत

 


बुलडाणा, (जिमाका) दि. 17 :  वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची आरटीई (RTE) 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 10 मार्च 2026 या कालावधीत मुदत देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (C) नुसार खाजगी विना अनुदानीत, कायम विना अनुदानीत तसेच स्वयंअर्थ सहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी शासन स्तरावरून सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या असून, पालकांनी संबंधित अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सुधारित नियम, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रियेची माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी(प्राथमिक) यांनी केले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र बालकांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा व पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज विहित मुदतीत भरावा, असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शाळा, तालुकास्तर कार्यालये व शिक्षण क्षेत्रातील संस्थांनी आपल्या स्तरावरून या प्रवेश प्रक्रियेची व्यापक प्रसिद्धी करून अधिकाधिक विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना