जिल्ह्यातील हतेडी व पिंपळगाव काळे प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’ पुरस्कार;

 




Ø  आतापर्यंत जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरस्कार

बुलढाणा, दि. 16 (जिमाका): आरोग्य सेवेतील गुणवत्तेला अधोरेखित करणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन(NQAS) अंतर्गत बुलढाणा जिल्ह्याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. बुलढाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी आणि जळगाव जामोद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव काळे यांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार प्राप्त झाले आहे.

यापूर्वी किन्होळा, गणेशपूर आणि जानेफळ या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना NQAS मानांकन मिळाले होते. नव्या समावेशामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवजाळ, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र सरपाते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव काळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला पाटील आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन करण्यात आले.

केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्याचा राष्ट्रीय मानांकनात समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कामकाज करून हे यश संपादन केल्याचे सांगितले जाते.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आढावा बैठका नियमित घेतल्या जात आहेत. अधिकारी ते आशा सेविका अशा सर्व घटकांच्या समन्वयातून ही कामगिरी साध्य झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. भविष्यातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यावर भर राहील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सांगितले.

मानांकन प्रक्रियेत जिल्हा गुणवत्ता आश्वासन चमूतील नोडल अधिकारी तथा जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका शीतल साखळीकर, कार्यक्रम सहाय्यक अमर राठोड तसेच आधार फाउंडेशन यांनी पर्यवेक्षण करून आवश्यक सुधारणा केल्या.

राष्ट्रीय मानांकनानंतर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुढील तीन वर्षांसाठी दरवर्षी 3 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या निधीतून रुग्ण सुविधा वाढविणे व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याची ओळख अधिक भक्कम झाली असून आरोग्य सेवेतील गुणवत्ता व कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या