कृषी दिनानिमित्त प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव; 22 शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान
बुलढाणा, दि. 01 (जिमाका): हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद बुलढाणा येथे कृषी विभाग जिल्हा
परिषद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील प्रगतिशील महिला
व पुरुष शेतकऱ्यांचा पुरस्कार व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
शिवाजी सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या
हस्ते कै. वसंतराव नाईक व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्ह्यातील आठ महिला शेतकऱ्यांना 'राष्ट्रमाता
जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी सन्मान पुरस्कार' व प्रत्येकी तीन हजार रुपयांचे प्रोत्साहनपर
पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच १२ पुरुष शेतकऱ्यांना 'कै. वसंतराव नाईक प्रगतिशील
शेतकरी सन्मान पुरस्कार' व प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात
आले.
याशिवाय खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील प्रगतिशील
महिला शेतकरी वैशाली महेंद्र देशमुख यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी
म्हणून ११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मेहकर तालुक्यातील
मादनी येथील समाधान तेजराव मेटांगळे यांना कै. वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी म्हणून
११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे
यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासातील योगदानावर प्रकाश टाकत कृषी विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
व प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी खरीप हंगामातील आधुनिक लागवड तंत्रज्ञान, बदलत्या हवामानानुसार
पीक पद्धती तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
पुरस्कारप्राप्त शेतकरी वैशाली महेंद्र देशमुख यांनी आपल्या
शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली, तर प्रगतिशील शेतकरी वसंत दयाराम सोनस्कर
यांनी मनोगत व्यक्त केले. महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे यांनी बीजोत्पादन
कार्यक्रमाचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
अध्यक्षीय समारोपात मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात
यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, हवामान बदल लक्षात घेऊन पीक
पद्धतीत आवश्यक बदल आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब
मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा कृषी अधिकारी धिरज वाकोडे,
कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, मोहीम अधिकारी प्रमोद गायके, महाबीजचे जिल्हा
व्यवस्थापक अशोक ठाकरे, कृषी विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील
मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी
(कृषी) चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभागाच्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
00000
Comments
Post a Comment