हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन; मृग बहार 2026-27 साठी 8 फळपिकांचा समावेश

 


बुलढाणा, दि. 01 (जिमाका): प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 च्या मृग बहारासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असून, बुलढाणा जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

दिनांक 27 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार यंदाच्या मृग बहारात चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, डाळिंब, मोसंबी, संत्रा तसेच हळद या आठ पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. कमी पाऊस, पावसाचा खंड, अतिवृष्टी, वाढलेले तापमान व जादा आर्द्रता अशा हवामान जोखमींमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे आणि फळबागांचे आर्थिक स्थैर्य कायम राखणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांची लागवड करणारे कर्जदार व बिगर कर्जदार, तसेच कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अंतर्गत पीक नोंदणी, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तसेच ई-पीक पाहणी करणे बंधनकारक राहणार आहे. नुकसानभरपाई थेट खात्यात मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.

योजनेत एका शेतकऱ्यास किमान 0.20 हेक्टर व कमाल 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू राहील. एका फळपिकासाठी एका वर्षात मृग किंवा आंबिया बहार यापैकी केवळ एका हंगामासाठीच विमा घेता येणार आहे.

यंदा केंद्र शासनाने विमा हप्ता 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित केला असून, 30 ते 35 टक्क्यांदरम्यानचा अतिरिक्त 5 टक्के हप्ता राज्य शासन भरणार आहे. त्यापुढील हप्त्याची रक्कम राज्य शासन व शेतकरी समप्रमाणात उचलणार आहेत. विमा अर्जांची संख्या एका तालुक्यात 500 पेक्षा अधिक असल्यास रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे क्षेत्र पडताळणी करण्यात येईल. 500 पेक्षा कमी अर्ज असल्यास कृषी विभागाच्या सहकार्याने प्रत्यक्ष फळबागांची पाहणी केली जाईल.

संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू, चिकू व हळद या पिकांसाठी विमा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2026 असून, सीताफळ पिकासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम तारीख आहे. शेतकऱ्यांनी बँका, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी किंवा ऑनलाइन माध्यमातून वेळेत अर्ज करावेत.

फळबाग उत्पादकांनी अधिक माहितीसाठी संबंधित बँक, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी