अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मोबाईल अॅप सुरू; योजनांची प्रक्रिया आता थेट मोबाईलवर

 


बुलढाणा, दि. 21 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांसाठी डिजिटल सेवांकडे मोठे पाऊल टाकत Annasaheb Patil Mahamandal App हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. हे अॅप Google Play Store वर उपलब्ध असून, लाभार्थ्यांना आता योजनांची संपूर्ण प्रक्रिया थेट मोबाईलवर करता येणार आहे.

महामंडळाच्या योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ आधीपासून कार्यरत असून, संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन करण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संगणक किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत असल्याने लाभार्थ्यांना वेळ व खर्च वाढत होता. काही ठिकाणी एजंटमार्फत फसवणुकीच्या घटनाही घडत होत्या. या पार्श्वभूमीवर महामंडळाने नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करून प्रति सेवा 85 रुपयांदराने सेवा उपलब्ध करून दिली होती.

आता नव्याने विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅपमुळे लाभार्थ्यांना अधिक सुरक्षित, सुलभ व स्वयंपूर्ण सेवा मिळणार आहे. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेलद्वारे OTP पडताळणी करून नोंदणी करता येणार आहे, तर पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येईल. महामंडळाच्या योजनांमध्ये LOI, Sanction आणि Claim असे तीन टप्पे असून आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येणार आहेत. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे आणि पुढील कार्यवाही करणे या सुविधा अॅपमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर होणार आहे.

सध्या क्लेम सादर करणाऱ्या तसेच नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून, यासाठी जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गूगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणीही सुलभ होणार आहे. ही माहिती महामंडळाच्या EHRMS प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. संगणकावरील सर्व सुविधा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आल्याने लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर अॅप डाउनलोड करून या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी