पशुधनासाठी १९६२ हेल्पलाईन ठरतेय जीवनवाहिनी; वर्षभरात ६४ हजार जनावरांना मिळाले जीवदान

 


 

बुलढाणा दि. 22 (जिमाका): पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेली '१९६२' ही टोल फ्री हेल्पलाईन आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना त्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर' मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. 

 

पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. विशेषतः दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून त्यांच्यासाठी ही सेवा खऱ्या अर्थाने 'लाईफलाईन' ठरली आहे. अपघात, विषबाधा किंवा कठीण प्रसूती अशा आपत्कालीन स्थितीत कॉल आल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथक प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचते. या तत्परतेमुळे ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचले असून यामध्ये २९,१३० मोठे व ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे. 

 

या हेल्पलाईनद्वारे आजारी जनावरांवर तातडीचे उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण, कृत्रिम रेतन, वंध्यत्व तपासणी आणि अपघाती सेवा पुरविल्या जातात. याशिवाय चॅटबॉटद्वारे माहिती आणि शासकीय योजनांची माहितीही पशुपालकांना दिली जाते. पूर्वी किरकोळ आजारासाठीही जनावरांना दवाखान्यात नेणे जिकिरीचे व महागडे ठरत असे, परंतु आता तज्ज्ञ पशुवैद्यक स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्याने संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखणेही सुलभ झाले आहे. यामुळे दुग्धव्यवसाय हा एक शाश्वत व फायदेशीर व्यवसाय म्हणून आकारास येत आहे. 

 

आगामी काळात ही सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्राथमिक सल्ला आणि व्हॉट्सअॅप चॅटबॉट यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे नियोजन असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या प्रगत प्रणालीमुळे प्रत्येक कॉलचे अचूक ट्रॅकिंग करणे आणि दुर्गम भागातील गरजांचे विश्लेषण करून अधिक नियोजनबद्ध काम करणे शक्य होणार आहे. डिजिटल क्रांतीची ही जोड पशुधनाची हानी कमी करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देणारी ठरेल.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी