*विशेष लेख**प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: स्वच्छ इंधन, निरोगी जीवन*
*विशेष लेख*
*प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: स्वच्छ इंधन, निरोगी जीवन*
भारताच्या ग्रामीण भागात दीर्घकाळापासून स्वयंपाकासाठी लाकूड, शेणकांड्या आणि कोळसा यांसारख्या पारंपरिक इंधनाचा वापर होत होता. या इंधनामुळे निर्माण होणारा धूर महिलांच्या व लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत होता. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) सुरू केली.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा शुभारंभ १ मे २०१६ रोजी झाला. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारे LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे आहे. तसेच पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे, महिलांचे व कुटुंबाचे आरोग्य सुधारणा, धूरमुक्त स्वयंपाकघर निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ही योजना केवळ गॅस कनेक्शनपुरती मर्यादित नसून महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे.
केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत विस्तारीत टप्पा-2 मध्ये 75 लाख तर विस्तारीत टप्पा-3 मध्ये 25 लाख असे एकूण 1 कोटी अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा उज्वला समितीही स्थापन करून लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून, प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत विस्तारीत योजना 1 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील, 1 लाख 89 हजार 347 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तथापि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हात विस्तारीत टप्पा-2 मध्ये 8 हजार 694 लाभार्थी तर विस्तारीत टप्पा-3 मध्ये 7 हजार 483 लाभार्थी असे एकूण 16 हजार 177 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे.
*योजनेचा लाभ :* योजनेचा लाभ गरीबी रेषेखालील (BPL) कुटुंब, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), अंत्योदय अन्न योजना लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी, इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना दिला जातो. मोफत एलपीजी गॅस कनेक्शन, सुमारे रु. 1600 पर्यंत आर्थिक सहाय्य, गॅस शेगडी व पहिला सिलिंडर हप्त्यांवर उपलब्ध, PMUY 2.0 अंतर्गत काही लाभार्थ्यांना मोफत रिफिल. अर्ज करणाऱ्या महिलेच्या नावावर आधीपासून LPG कनेक्शन नसणे आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रे :* राशन कार्ड, आधारकार्ड (कुटुंबातील सर्व व्यक्तीचे 18 वर्षावरील), बँक पासबुक झेरॉक्स (महिला राष्ट्रीयकृत बँकेचे), तीन फोटो (पासपोर्ट), मोबाईल नंबर, प्रधान मंत्री उज्वला योजनेसाठी हमीपत्र आवश्यक.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही देशातील महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही, तर जीवनमानही उंचावते. “धूरमुक्त घर – निरोगी कुटुंब” ही संकल्पना साकार करत ही योजना भारताच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावत आहे.
- *संकलन*
*सतिश आनंदराव बगमारे, उपसंपादक*
*जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा*
000000
Comments
Post a Comment