लोणारमध्ये 24 ते 26 एप्रिल दरम्यान 'खगोल दर्शन महोत्सवा'चे आयोजन; 'डार्क स्काय' उपक्रमातून अवकाशाचे रहस्य उलगडणार

 


बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि 'आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताहा'च्या पार्श्वभूमीवर, जागतिक वारसा स्थळ असलेल्या लोणार येथे 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान 'खगोल दर्शन महोत्सव 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित हा महोत्सव पर्यटकांना अवकाशाचे विलोभनीय दर्शन घडवणार आहे.

                        लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले जगातील एक अद्वितीय सरोवर आहे. येथील परिसर प्रकाश प्रदूषणापासून मुक्त असल्याने 'डार्क स्काय' संवर्धनासाठी अत्यंत अनुकूल आहे. या महोत्सवांतर्गत स्टारगेझिंग (आकाश निरीक्षण): तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना नक्षत्र, ग्रह आणि ताऱ्यांचे जवळून निरीक्षण करता येईल. प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि नैसर्गिक अंधाराचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन व माहितीपट दाखवले जातील. निसर्ग संवर्धन आणि विज्ञानाची सांगड घालून 'अॅस्ट्रोटुरिझम'ला (खगोल पर्यटन) चालना देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

हा महोत्सव पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे (भाप्रसे) आणि MTDC चे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, 'अॅस्ट्रोइनॅरा'च्या संस्थापिका श्वेता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्टारगेझिंग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

 लोणारचा प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावा यासाठी येथे विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये एमटीडीसी पर्यटक निवास, पर्यटक अभ्यासगत केंद्र, तारांगण, प्रयोगशाळा आणि योग केंद्राचा समावेश आहे. नवीन एमटीडीसी पर्यटक निवासाचे बांधकामही प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोणारमधील हा उपक्रम केवळ खगोलशास्त्रापुरता मर्यादित नसून तो पर्यावरणाशीही निगडित आहे. शाश्वत पर्यटनाला यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास प्रधान सचिव संजय खंदारे यांनी व्यक्त केला आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्र्यांनी केले आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, विभाग प्रमुख मानसी ताटके, प्रादेशिक व्यवस्थापक योगेश निरगुडे आणि लोणारचे व्यवस्थापक सदानंद दाभाडे विशेष परिश्रम घेत आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी