यशकथा:**जिद्द, चिकाटी आणि सरकारी योजनेची साथ – अनिता देशमुख यांचा स्वावलंबनाचा प्रवास*


> *यशकथा:*

*जिद्द, चिकाटी आणि सरकारी योजनेची साथ – अनिता देशमुख यांचा स्वावलंबनाचा प्रवास*


बुलढाणा येथील अनिता रवींद्र देशमुख यांची कथा म्हणजे जिद्द, चिकाटी आणि योग्य वेळी मिळालेल्या शासकीय मदतीमुळे घडलेले यशस्वी परिवर्तन होय. एक सामान्य गृहिणी असलेल्या अनिताताईंनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात साकार केले.

घरची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभे करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. बँकेचे कर्ज आणि त्यावरील व्याज ही चिंता त्यांच्या पुढे उभी होती. मात्र, अशा परिस्थितीत त्यांना ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या योजनेची माहिती मिळाली आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक वळण आले.

या योजनेअंतर्गत ‘वैयक्तिक कर्ज व्याज परतावा’ या सुविधेमुळे त्यांनी धाडसाने पुढाकार घेतला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दि बुलढाणा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बँक यांच्या माध्यमातून त्यांना १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले.
या भांडवलाच्या सहाय्याने अनिताताईंनी “मॅचवेल लेडीज शॉपी” हे दुकान सुरू केले. साड्या, ड्रेस मटेरियल आणि महिलांसाठी आवश्यक फॅशनेबल वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देत त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली.

सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहक मिळवणे सोपे नव्हते. मात्र, त्यांनी संयम, सातत्य आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा या तत्त्वांचा अवलंब केला. दर्जेदार वस्तू, वाजवी दर आणि नम्र संवाद यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात त्या यशस्वी झाल्या. हळूहळू माऊथ पब्लिसिटीमुळे दुकानाची ओळख वाढत गेली आणि “मॅचवेल लेडीज शॉपी” हा एक विश्वासार्ह ब्रँड बनला. आज त्या या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवत असून आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनल्या आहेत.

आपल्या यशाबद्दल अनिता देशमुख  म्हणतात, “या योजनेच्या मदतीशिवाय माझे स्वप्न पूर्ण झाले नसते. आज मी आत्मनिर्भर बनले आहे, याचा मला अभिमान आहे.” आगामी काळात व्यवसायाचा विस्तार करून इतर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे त्यांचे पुढील ध्येय असल्याचे अनिता देशमुख यांनी सांगितले.
0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी