मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अॅथलेटिक्स व वेटलिफ्टिंग निवडचाचणी 23 एप्रिल रोजी
बुलढाणा,
दि. 21 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या
क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राज्यातील क्रीडा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या
महत्त्वाकांक्षी “मिशन लक्ष्यवेध”उपक्रमाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास
केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. या केंद्रांद्वारे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना ऑलिम्पिक
स्तरावर घडविण्याचा उद्देश असून विविध खेळांच्या निवडचाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली
आहे.
जिल्ह्यात अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन,
बॉक्सिंग व वेटलिफ्टिंग या पाच प्रमुख क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित
केली जाणार आहेत. प्रत्येक खेळासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार असून त्यांना
केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यामध्ये गुणवत्ताधारक प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, पूरक आहार, क्रीडा
साहित्य, गणवेश, वैद्यकीय चाचण्या तसेच देश-विदेशातील प्रशिक्षणाची संधी यांचा समावेश
असेल.
अॅथलेटिक्स व वेटलिफ्टिंग या खेळांच्या
निवडचाचण्या दि. 23 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अॅथलेटिक्ससाठी चाचणी
जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे सकाळी 7 वाजता होणार असून वेटलिफ्टिंगची चाचणी तालुका
क्रीडा संकुल, मलकापूर येथे सकाळी 9 वाजता घेण्यात येणार आहे. अर्ज सादर केलेल्या तसेच
इच्छुक खेळाडूंनी संबंधित दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण
महानकर यांनी केले आहे. अर्जासोबत मूळ कागदपत्रे व तीन छायाचित्रे जोडणे आवश्यक असून
बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी
नमूद केले आहे.
0000
Comments
Post a Comment