राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
बुलढाणा, (जिमाका) दि. 20: डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या
वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेस आता २५ एप्रिल
२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये
विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणे
हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
यांनी दिली. या स्पर्धेसाठी “डॉ.
आंबेडकर यांचे महिलांविषयी कार्य व महिला सक्षमीकरणातील योगदान”
हा विषय निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या
गटात शासकीय व खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या
गटासाठी निबंधाची शब्दमर्यादा ५०० ते ८०० शब्दांची आहे. दुसरा खुला गट असून राज्यातील
सर्व महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित
करण्यात आली आहे. दोन्ही गटांसाठी निबंध मराठी भाषेतच सादर करणे बंधनकारक आहे.
पूर्वी
स्पर्धेचा कालावधी १४ एप्रिल ते २० एप्रिल असा होता; मात्र स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद
लक्षात घेऊन मुदत २५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या
स्पर्धकांनी ९१५२२३०१९३ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच नोंदणीसाठी उपलब्ध क्यूआर
कोडचा वापर करावा. नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना पोच पावती दिली जाणार आहे.
या
उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण
विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देण्यात येणार
असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती
सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, बुलढाणा यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment