यशोगाथा : ‘संत सावता माळी’ महिला बचत गटाने साधला आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग

 


 

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील CMRC देऊळगाव मही केंद्राच्या माध्यमातून पांगरी माळी या गावात महिलांच्या सक्षमीकरणाची एक प्रेरणादायी कथा घडली आहे. देऊळगाव महीपासून सुमारे ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे २५०० असून येथे १९ बचत गट कार्यरत आहेत. गावात शाळा, अंगणवाडी, पाणी फिल्टर यंत्र, जनावरांसाठी दवाखाना अशा मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. सुमारे २०० महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत.

या गावातील ‘संत सावता माळी महिला बचत गट’ हा एक आदर्श गट ठरला आहे. या गटाची स्थापना २७ डिसेंबर २०१५ रोजी झाली असून गटात ११ महिला सदस्य आहेत. सुरुवातीला गटाला बँकेकडून १ लाख १० हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यानंतर वेळोवेळी कर्जसुविधा मिळत गेली आणि गटाने आर्थिक प्रगतीचा मार्ग धरला.

 

गटातील महिलांनी भाजीपाला उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमासाठी गटातील अनिता सोपान वाघ यांची निवड करण्यात आली. पूर्वी त्या स्वतःच्या शेतात काम करत होत्या, परंतु भांडवलाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात शेती करणे शक्य होत नव्हते. CMRC देऊळगाव महीच्या मार्गदर्शनाखाली करार पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

या करारानुसार शेतकऱ्याची जमीन वापरून ४०% नफा शेतकऱ्याला आणि ६०% नफा गटाला मिळेल, अशा भागीदारीत भाजीपाला उत्पादन सुरू करण्यात आले. गटातील महिलांनी मेहनत, नियोजन आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर उत्पादन वाढवले आणि चांगले उत्पन्न मिळवले.

 

आज ‘संत सावता माळी’ बचत गटाने केवळ आर्थिक प्रगतीच साधलेली नाही, तर गावातील इतर महिलांसाठीही प्रेरणा निर्माण केली आहे. या यशामुळे गावातील आणखी गटांनी बँक लिंकेज करून ५ लाखांपर्यंत कर्ज घेत व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे. ही यशोगाथा दाखवून देते की, योग्य मार्गदर्शन, एकजूट आणि मेहनत यांच्या जोरावर ग्रामीण महिला आत्मनिर्भर होऊ शकतात आणि आपल्या कुटुंबासह गावाच्या विकासातही मोलाचा वाटा उचलू शकतात.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी