जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह'; विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन
बुलढाणा
(जिमाका), दि. 8 : सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
जिल्ह्यात दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा
करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, समाज कल्याण
विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा
मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या
सप्ताहाची सुरुवात आज करण्यात आली असून सामाजिक न्याय विभागाच्या योजनाची माहिती पत्रकार
परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. 9 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे
महाराज यांच्या विचारांवर जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व वसतिगृहामध्ये निबंध, वक्तृत्व
आणि लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. 10 एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून
पथनाट्ये सादर करून सामाजिक न्याय विभागाच्या 'मार्जिन मनी' योजनेसह इतर महत्त्वाच्या
योजनांचे प्रबोधन केले जाईल. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम तसेच 'संविधान जागर' अंतर्गत भारतीय
संविधानाची माहिती व महिला मेळाव्याचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलाविषयक
कार्य अधोरेखित केले जाईल.
13 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळेत रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान
व जात पडताळणी प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना अभिवादन करण्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये मान्यवरांची
व्याख्याने व चर्चासत्रे होतील. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000000



Comments
Post a Comment