विशेष लेख : उन्हाळ्यातील जनावरांचे चारा व पाणी व्यवस्थापन

 



उन्हाळ्यातील कडक उन्हाचा आणि वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. या काळात जनावरांना 'हीट स्ट्रेस' (उन्हाचा ताण) जाणवतो, ज्यामुळे दूध उत्पादनात घट आणि आजार वाढतात. यासाठी खालीलप्रमाणे चारा आणि पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

पाणी व्यवस्थापन :  उन्हाळ्यात जनावरांच्या शरीरातील पाण्याची गरज ५०% पर्यंत वाढते. त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी चोवीस तास उपलब्ध असावे. जर चोवीस तास पाणी देणे शक्य नसेल, तर दिवसातून किमान ५ ते ६ वेळा पाणी पाजावे. विशेषतः पहाटे आणि रात्री उशिरा भरपूर पाणी द्यावे.  पिण्याच्या पाण्याची टाकी सावलीत असावी जेणेकरून पाणी गरम होणार नाही. गरम पाणी जनावरे कमी पितात.

चारा व्यवस्थापन : भर दुपारी जनावरांना चारा देणे टाळावे. उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावते. त्यामुळे चारा देण्यासाठी पहाटे सकाळी ६ पूर्वी आणि रात्री ९ नंतर या वेळा निवडाव्यात. नुसता वाळलेला चारा देऊ नये, त्यामुळे जनावरांना बद्धकोष्टतेचा त्रास होऊ शकतो. हिरवा व वाळलेला चारा ३:१ या प्रमाणात कुट्टी करून द्यावा. हिरव्या चाऱ्याची टंचाई असल्यास 'मुरघास' हा सर्वोत्तम पर्याय आहे. तो थंड आणि पाचक असल्याने जनावरे आवडीने खातात.

आहाराची पौष्टिकता वाढवणे :  घामावाटे शरीरातील क्षार कमी होतात. त्यामुळे दररोज प्रति जनावर ५० ते १०० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. आहारात ऊर्जा वाढवण्यासाठी सरकी पेंड, मका भरडा किंवा पशुखाद्याचा वापर योग्य प्रमाणात करावा. उपलब्ध असलेल्या कोरड्या चाऱ्यावर (कडबा/कुटार) युरिया-गूळ प्रक्रिया केल्यास त्याची पौष्टिकता वाढते.

गोठ्यातील व्यवस्थापन : गोठ्याचे छत सिमेंटचे किंवा पत्र्याचे असेल तर त्यावर गवत किंवा पाचट टाकावे. गोठ्याच्या बाजूला 'ग्रीन नेट' किंवा गोणपाटाचे पडदे लावावेत. गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंख्यांची सोय करावी. जास्त उष्णता असल्यास जनावरांच्या अंगावर किंवा गोठ्यात फॉगर्स (फवारे) चालवावेत.

विशेष काळजी : दूध काढण्याची वेळ उन्हाळ्यात शक्य तितकी लवकर (पहाटे) आणि उशिरा (संध्याकाळी) ठेवावी. जनावरांना शक्य असल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याने अंघोळ घालावी. थोडक्यात सांगायचे तर, उन्हाळ्यात जनावरांना थंडावा, पुरेसे पाणी आणि सकस आहार दिला तरच त्यांचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकून राहते.

लेखक :- डॉ. गणेश उत्तमराव काळुसे, शास्त्रज्ञ(पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र)

डॉ. अमोल सुरेशराव झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी