खाजगी नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी : २३ एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह

 


बुलढाणा, दि. 21 (जिमाका):  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलढाणा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ एप्रिल २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

हा प्लेसमेंट ड्राइव्ह गुरुवारी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली (जि. बुलढाणा) येथे पार पडणार आहे. या उपक्रमामध्ये चिरायु पॉवर, खामगाव, क्रेडीट अॅक्सीस ग्रामीण, नांदुरा तसेच क्वीस कॉर्प, पुणे या नामांकित कंपन्यांनी त्यांच्या विविध रिक्त पदांची नोंदणी केली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत कंपनी प्रतिनिधींमार्फत घेण्यात येणार असून, प्राथमिक निवडही याच ठिकाणी केली जाणार आहे. तसेच काही उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध होणार आहे.

१० वी, १२ वी, आयटीआय तसेच पदवीधर पात्रता असलेले पुरुष व महिला उमेदवार या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ शकतात. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी दिली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून नोंदणी करून मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथील (०७२६२-२४२३४२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या