‘अमृत’ कडून राज्यव्यापी परिवार सर्वेक्षण मोहिम; 8 ते 25 एप्रिलदरम्यान
बुलढाणा (जिमाका), दि. 9 : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था
असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्याकडून राज्यातील
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 8 ते 25 एप्रिल या कालावधीत राज्यव्यापी
परिवार सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अमृतचे व्यवस्थापकीय संचालक
विजय जोशी यांनी दिली.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हे
सर्वेक्षण राबविण्यात येणार असून, लक्षित गटातील कुटुंबांची अचूक संख्या निश्चित करणे,
त्यांच्या गरजा व अपेक्षा जाणून घेणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या योजना
तयार करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना स्वतंत्र
शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांच्या
उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत आहे. सध्या या सर्वेक्षणात ब्राह्मण, सिंधी, हिंदू
मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ,
अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर,
जाट, कानबी, कोमटी आणि वैश्य अशा सुमारे २५ जातींचा समावेश आहे. सर्वेक्षणानंतर या
यादीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या घटकांतील युवक-युवतींसाठी व्यक्तिमत्त्व
विकास, औद्योगिक व प्रगत कौशल्य प्रशिक्षण, रोजगारक्षम कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी
शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी
वैयक्तिक व्याज परतावा अशा विविध योजना सध्या राबविल्या जात आहेत.
भविष्यात या योजनांची व्याप्ती वाढवून
अधिक परिणामकारक व मूल्यवर्धित योजना तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार
आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने या नोंदणी मोहिमेत सहभागी होऊन शासनाच्या
योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment