अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल उपक्रम; लाभार्थ्यांना ‘लोकल ते ग्लोबल’ची संधी
बुलढाणा (जिमाका), दि.16 : राज्यातील
आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना
सक्षम उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने
विविध डिजिटल उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये व्यवसाय वर्धन
(Marketing Tab), डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम आणि डिजी लॉकर एकत्रीकरण यांचा समावेश
असून, लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे.
डिजिटल
बाजारपेठेची सुविधा : महामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर ‘व्यवसाय वर्धन
(Marketing Tab)’ ही सुविधा सुरू केली आहे. Flipkart, Amazon आणि IndiaMART यांच्या
धर्तीवर विकसित करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची
माहिती, फोटो, किंमत व संपर्क तपशील अपलोड करता येतात.
सध्या
या प्लॅटफॉर्मवर 27 हजार 500 हून अधिक व्यवसायांची नोंद झाली असून, जिल्हा, तालुका
व व्यवसाय श्रेणीप्रमाणे शोध सुविधा उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना स्थानिक उत्पादने
सहज उपलब्ध होत असून “लोकल ते ग्लोबल”
ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात पेमेंट गेटवे
सुविधा उपलब्ध करून देण्याचाही महामंडळाचा मानस आहे.
डिजिटल
प्रशिक्षणातून कौशल्यविकास : व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये विकसित
करण्यावर महामंडळाचा भर आहे. Webinar, YouTube आणि Podcast च्या माध्यमातून विविध प्रशिक्षण
कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये व्यवसाय सुरू करणे व वाढविणे, ब्रॅंडिंग, डिजिटल
मार्केटिंग, ग्राहक हाताळणी, आर्थिक नियोजन आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाते. तज्ञ
व्यक्तींमार्फत तांत्रिक माहितीही उपलब्ध करून दिली जाते. प्रशिक्षणांचे व्हिडिओ
YouTube व Facebook वर उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील उद्योजकांनाही सोयीस्करपणे
शिक्षण घेता येत आहे.
DigiLockerमुळे
प्रक्रिया सुलभ : महामंडळाने DigiLocker सेवा आपल्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली असून,
कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक वेगवान व विश्वासार्ह झाली आहे. भविष्यात MAHA-ID
व UIDAI यांच्यासोबतही एकत्रीकरण करण्याची तयारी सुरू आहे.
या
सर्व उपक्रमांमुळे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने स्वावलंबी व सक्षम उद्योजक बनण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे.
00000
Comments
Post a Comment