“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
बुलढाणा (जिमाका), दि.10 : “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा
व आढावा सभा येथील वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या
अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या
विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम
करणे, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची
प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.
मिलिंद जाधव यांनी आरसीएच कार्यक्रमांतर्गत एचपीव्ही (HPV) लसीकरणाचा तालुकानिहाय आढावा
घेत उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.
वर्षा गुट्टे यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचा आढावा घेत संबंधित कामकाजाबाबत
मार्गदर्शन केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
रणजीत मंडाले यांनी विविध आरोग्य कार्यक्रम व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे
निर्देश दिले. ग्रामीण भागात सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे, वृत्तपत्रे आणि यशोगाथांचा
प्रभावी वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच कमी प्रगती असलेल्या कार्यक्रमांमध्ये
सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
डब्ल्यूएचओचे डॉ. सम्यक खौरे यांनी
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन केले. बैठकीत तालुका आरोग्य
अधिकाऱ्यांनी अभियानाशी संबंधित कामकाजाबाबत सादरीकरण केले. या प्रसंगी सर्व तालुका
आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी
शिवराज चौहान, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धुतडमल, अनिल लोखंडे व सुनील लोखंडे
उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment