एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन

 


बुलढाणा,दि.8 (जिमाका) : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणारा गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा गंभीर आणि चिंताजनक आजार ठरत असून, त्यापासून बचावासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी स्पष्ट केले आहे. लसीबाबत समाजात पसरत असलेल्या अफवा व गैरसमजांना बळी न पडता नागरिकांनी जागरूकता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा मुख्य कारणीभूत घटक आहे. या विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी एचपीव्ही लस प्रभावी उपाय ठरते. विशेषतः 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही लस अधिक उपयुक्त असून, योग्य वयात घेतल्यास भविष्यात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

सध्या सोशल मीडियावर लसीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. काही ठिकाणी लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होतात, अशी भीती निर्माण केली जात आहे; मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. एचपीव्ही लस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून अनेक देशांमध्ये ती सुरक्षितपणे वापरली जात आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते सांगितले.

एचपीव्ही लस का महत्त्वाची : गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून प्रभावी संरक्षण, एचपीव्ही संसर्गाचा धोका कमी, योग्य वयात घेतल्यास दीर्घकालीन लाभ, सुरक्षित आणि परिणामकारक लसीकरण,

 गैरसमज दूर करा : लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होत नाहीत, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण पूर्णपणे सुरक्षित, अफवांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला अधिक विश्वासार्ह.

मुलींच्या आरोग्यासाठी वेळेवर एचपीव्ही लसीकरण करून त्यांना गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवावे. महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता, एचपीव्ही लस घेणे ही काळाची गरज आहे. ही लस सुरक्षित असून कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते, असेही त्यांनी नमूद केले.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी