बुलढाण्यात ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’ महोत्सव; उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

 


बुलढाणा,दि.8 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’ हा लघुउद्योग, व्यवसाय व उद्योजकता महोत्सव 11 ते 13 दरम्यान बुलढाणा येथे आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक लघुउद्योजक, महिला बचतगट, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना थेट बाजारपेठ, प्रशिक्षण व मार्गदर्शनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील उद्योजकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा असून, उत्पादनांची थेट विक्री, ग्राहकांशी संवाद आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच, उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण आणि नेटवर्किंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

‘अमृतपेठ’ हे केवळ प्रदर्शन नसून, तरुणांना स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. या माध्यमातून अनेक युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत असून, स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे.  दोन दिवसीय या महोत्सवात हस्तकला, घरगुती उद्योग, कृषी आधारित उत्पादने, फूड प्रोडक्ट्स तसेच सेवा क्षेत्रातील विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार स्थानिक उत्पादनांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

महिला व पुरुष, युवक-युवती तसेच उद्योजकांनी आपल्या उत्पादनांसाठी स्टॉल बुक करण्यासाठी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. इच्छुकांनी जिल्हा व्यवस्थापक, अमृत जिग्रेश कमानी यांच्याशी  9112227637 / 8308998922 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 ‘अमृतपेठ २०२६’ ही स्वदेशी उत्पादनांची खरी बाजारपेठ ठरणार असून, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देत रोजगारनिर्मिती व उद्योजकतेला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी