उष्णतेच्या लाटेत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीचे निर्देश; नियोक्त्यांना उपाययोजना राबविण्याचे आवाहन

 


बुलढाणा दि.27 (जिमाका): राज्यासह देशभरात वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कामगार व मजूर वर्गाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विशेषतः बांधकाम, औद्योगिक, खाण व इतर क्षेत्रांतील कामगार उष्णतेच्या जोखमीला सामोरे जात असल्याने त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग, बांधकाम कंपन्या व संबंधित आस्थापनांना कामगारांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कामाच्या वेळांमध्ये आवश्यक ते बदल करून उष्णतेच्या तीव्र काळात काम टाळण्याचे, तसेच कामगारांना स्वच्छ पिण्याचे पाणी, सावली व विश्रांतीची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्राथमिक उपचार साहित्य, आईस पॅक व उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक साधने उपलब्ध ठेवण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करण्यावरही भर देण्यात आला आहे.

कारखाने व खाण क्षेत्रासाठी विशेष सूचनांमध्ये कामाचा वेग कमी ठेवणे, दिवसातील थंड वेळेत जड कामे करणे, विश्रांती वेळेत बदल करणे आणि गरजेनुसार दोन कामगारांची टीम नेमण्याचा समावेश आहे. तसेच कामाच्या ठिकाणी विश्रांतीची सोय, थंड पाणी व इलेक्ट्रोलाइट्सची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

कामगारांमध्ये उष्णतेचे धोके व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे. कामगार नाके व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहिमा राबविणे, तसेच पोस्टर्स, बॅनर्स व आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित सर्व आस्थापनांनी या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नियमित निरीक्षण यंत्रणा उभारावी, तसेच कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेस प्राधान्य देत वैयक्तिक लक्ष देण्याचे आवाहनही कामगार अधिकाऱ्यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी