यशोगाथा एक पाऊल स्वावलंबनाकडे : रमाई बचत गटाची यशस्वी वाटचाल

 


 

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात महिलांच्या आर्थिक विकासासाठी 2003 साली महिला बचत गटांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचे लोकसंचालित साधन केंद्र मिळाले आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागला. ही त्या यशस्वी महिलांपैकी एका बचत गटाची यशोगाथा आहे.

 

जळगाव जामोद तालुक्यातील सुणगाव हे एक छोटे गाव आहे. येथे विविध समाजातील लोक राहतात, परंतु आर्थिकदृष्ट्या मागासलेपण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. विशेषतः महिलांची स्थिती अधिक कठीण होती. या पार्श्वभूमीवर महिलांना संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.  दि. 10 ऑक्टोबर 2003 रोजी 10 गरजू महिलांना एकत्र करून “रमाई स्वयं-सहाय्य महिला बचत गट” स्थापन करण्यात आला. सुरुवातीला महिलांना बचत, बँक व्यवहार, कर्ज प्रक्रिया याबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

 

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रथम 1 हजार रुपये कर्ज मिळाले. त्यानंतर बँक व पंचायत समितीच्या सहाय्याने 25 हजार रुपये कर्ज मिळाले. या कर्जाचा उपयोग महिलांनी शेती, शिक्षण, घर दुरुस्ती व इतर गरजांसाठी केला. यानंतर शासनाच्या पूरक पोषण आहार योजनेत गटाची निवड झाली आणि अंगणवाडीला आहार पुरविण्याचे काम मिळाले. यामुळे गटाच्या उत्पन्नात वाढ झाली आणि महिलांचा आत्मविश्वासही वाढला.

 

2008 मध्ये गाव विकास समिती स्थापन करण्यात आली. यामुळे महिलांचा विविध शासकीय योजनांमध्ये सहभाग वाढला आणि समाजात त्यांना मान-सन्मान मिळू लागला. महिलांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंचायत समितीमार्फत 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज मिळाले आणि 10 महिलांनी गायी/म्हशी घेतल्या. या व्यवसायातून चांगला नफा मिळू लागला. त्यानंतर महिलांनी शेतीकडे वळून हळद, कापूस, भाजीपाला व इतर पिकांची लागवड सुरू केली. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन त्यांनी उत्पादन वाढवले.

 

EAP प्रशिक्षणातून महिलांना कळले की उत्पादनावर प्रक्रिया केल्यास अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळे त्यांनी हळद व इतर उत्पादनांवर प्रक्रिया करून विक्री सुरू केली. लोकसंचालित साधन केंद्राच्या मदतीने त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली. प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना प्रदर्शनांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. कच्चा माल 90 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात असताना, प्रक्रिया केल्यानंतर तो  1 लाख 80 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जात आहे. आज या बचत गटामुळे महिलांना रोजगार मिळाला असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. इतर गटांनाही या गटाकडून प्रेरणा मिळत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या