बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवर विदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

 


 

बुलढाणा दि.28 (जिमाका): विदर्भात सध्या उष्णतेची लाट जाणवू लागली असून बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोमवारी जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद ४३.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून, सरासरीच्या तुलनेत तापमानात ४ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.

 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याचे किमान तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता सायंकाळच्या सुमारास २१ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा प्रभाव अधिक जाणवत आहे.

 

संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेने होरपळून निघत आहे. सोमवारी विदर्भातील विविध शहरांमधील तापमानाची स्थिती खालीलप्रमाणे राहिली: विदर्भातील अमरावती (४६.६ C) आणि वर्धा (४६.५°C) ही शहरे सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. त्यानंतर अकोला येथे ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ४५.० अंश, चंद्रपूरमध्ये ४५.२ अंश आणि यवतमाळमध्ये ४५.२ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. गोंदिया (४१.०°C) आणि भंडारा (४२.०°C) या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थोडा कमी राहिला.

 

नागरिकांना खबरदारीचे आवाहन : जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, सुती कपड्यांचा वापर करणे आणि उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या