एचपीव्ही लसीकरणाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी कार्यशाळा संपन्न
एचपीव्ही लसीकरणाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी
कार्यशाळा संपन्न
बुलढाणा (जिमाका), दि. 7 : महिलांमध्ये वाढत्या गर्भाशय मुखाच्या
कर्करोगाच्या (Cervical Cancer) प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी एचपीव्ही संक्रमणाविषयी
जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा
येथील अर्बन हॉल, कारंजा चौक येथे महिला डॉक्टरांसाठी एचपीव्ही लसीकरण विषयावर एक
दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेत तज्ज्ञ डॉक्टरांनी एचपीव्ही
विषाणूचा प्रसार, त्याचे दुष्परिणाम तसेच एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व याविषयी
सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः किशोरवयीन मुलींना योग्य वयात लसीकरण केल्यास
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते, असे त्यांनी
स्पष्ट केले.
कार्यशाळेदरम्यान सहभागी महिला
डॉक्टरांनी आपले अनुभव मांडले. शंका-निरसन सत्र घेण्यात आले असून, आधुनिक लसीकरण
पद्धतींवरही सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागात एचपीव्ही लसीकरणाचा
प्रसार वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित
करण्यात आली.
कार्यशाळेचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी
कार्यालय, बुलढाणा व निमा वुमन्स फोरम, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात
आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी रायपूर डॉ. शिल्पा खराटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे नियोजन डॉ. वैशाली पडघाण व निमा वुमन्स फोरम यांनी केले. या
कार्यशाळेस बुलढाणा तालुक्यातील अनेक महिला डॉक्टर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या
शेवटी सर्व उपस्थितांनी एचपीव्ही लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचा संकल्प केला.
00000
Comments
Post a Comment