उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची २१ सप्टेंबरला मूल्यमापन चाचणी


बुलढाणा, दि. १९ (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम"  अंतर्गत असाक्षर व्यक्तींची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी, दि. २१ सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीसाठी राज्यातील एकूण ८,८९,९९० नोंदणीकृत असाक्षर व्यक्ती सहभागी होणार आहेत. यात जिल्ह्यातील 10,433 असाक्षर व्यक्तींचा समावेश असून त्यांनी रविवारी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण संचालक, पुणे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन, संख्याज्ञान विकसित करणे तसेच आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, बालसंगोपन, कुटुंब कल्याण यांसारखी महत्वाची जीवनकौशल्ये विकसित करणे हा आहे.

चाचणीबाबत महत्त्वाची माहिती :

  • चाचणीची वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा कालावधी : ३ तास (दिव्यांगांसाठी ६० मिनिटे अतिरिक्त वेळ)
  • माध्यम : मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली इ.
  • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप :
    • भाग क – वाचन : ५० गुण
    • भाग ख – लेखन : ५० गुण
    • भाग ग – संख्याज्ञान : ५० गुण
    • एकूण गुण : १५० गुण
    • प्रत्येक भागात व एकूण ३३% गुण अनिवार्य
    • जास्तीत जास्त ५ ग्रेस गुणांची तरतूद

 राज्यात या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व शाळास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आहेत. प्रत्येक शाळा हेच या योजनेचे अंमलबजावणीचे एकक आहे.

नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींनी चाचणी केंद्रावर जाताना स्वतःचा ओळखपत्राचा पुरावा (मतदार ओळखपत्र / आधारकार्ड / पॅनकार्ड / बँक पासबुक इ.) सोबत आणावा. तसेच नोंदणी फॉर्मसाठी एक आयकार्ड साईज फोटो सोबत ठेवावा, मात्र फोटो देणे बंधनकारक नाही.

नोंदणी व परीक्षा केंद्र

  • यू-डायस क्रमांकानुसार प्रत्येक शाळा हेच परीक्षा केंद्र असेल.
  • चाचणी फक्त उल्लास अॅपवर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींनाच देता येईल.
  • चाचणीच्या दिवशी ऑनलाईन नोंदणी करूनही परीक्षा देता येईल.

चाचणी ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल. परीक्षार्थींनी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचा वापर करावा.

चाचणी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येईल. यामुळे असाक्षर व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा होऊन त्यांना स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता व उच्च कौशल्य विकसित करण्याच्या संधी उपलब्ध होतील.

असाक्षर व्यक्तींनी रविवार, दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण संचालक यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या