मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा - केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

 


Ø  मलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

बुलढाणा दि. 11 (जिमाका) : शासकीय योजनांच्या प्रभावी व जलदगतीने  अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तालुकास्तरिय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेला सहपालकमंत्री ना. संजय सावकारे, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पदाधिकारी आणि तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या, देशाला समृद्ध करायचे असेल तर त्याची सुरुवात आपल्या ग्रामपंचायतपासून झाली पाहिजेत. या अभियानात लोकसहभाग असणे गरजेचे आहे. त्याशिवाय गावाचा विकास शक्य नाही. या अभियानांतर्गत राज्य शासनाने ग्रामपंचायत ते राज्यस्तरापर्यंत 15 लाख ते 5 कोटी रुपयापर्यंतची बक्षिसे जाहीर केली आहे. या रकमेतून ग्रामपंचायतींचा सर्वांगिण विकास करुन नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, आरोग्य सेवक यांसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्याने कसोशीने प्रयत्न करुन हा अभियान राबवावा. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ही संधी आहे. त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ गावकरी, सरपंच, ग्रामसेवकांनी करुन घ्यावा, ही संधी आहे. या अभियानाच्या माध्यमातून गाव हरित, स्वच्छ आणि लोकाभिमूख करायचे आहे. ग्रामपंचायत ते संसद अशी या अभियानाची संकल्पना आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याची संधी असून लोकसहभागाने एकत्रित येवून अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.


सहपालकमंत्री ना. संजय सावकारे म्हणाले, केंद्राच्या धर्तीवर राज्यात हे अभियान राबविले जात आहे. महाराष्ट्राच्या अनेक योजना देशपातळीवर स्वीकारल्या गेल्या. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. आज तरुण शहरांकडे जात आहेत. त्याचे कारण सोयीसुविधा हा आहे. या सोयीसुविधा ग्रामपंचायत स्तरावर दिल्यास हा शहराकडील ओढा कमी होईल. यासुविधा निर्माण करण्यासाठीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम होणार आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. ग्रामसेवक आणि सरपंचांनी लोकहितासाठी प्रामाणिकपणे कामे करावे, जी लोकांच्या स्मरणात राहतील. या अभियानातील सर्व घटकातील कामे करण्यासाठी सहभाग घ्यावा. गावांच्या विकासासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन सहपालकमंत्री ना. सावकारे यांनी केले.

यावेळी आमदार चैनसुख संचेती यांनी मनोगत व्यक्त करुन मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात म्हणाले, या अभियानात जनतेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. या अभियानातील घटकाची कामे ही कालबद्ध पद्धतीने करायची आहे. या अभियानात गावातील महिला, पुरुष, तरुणांचा सहभाग वाढवून लोकचळवळ निर्माण करण्याचे केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गाव समृद्ध करण्याची ही संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी बी.बी. हिवाळे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी माहिती दिली. तसेच यशदाचे प्रविण चव्हाण यांनी  या अभियानाची रुपरेषा सादरीकरणाद्वारे विषद केली.

*****

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या