शेगाव येथील टावरी परिवाराकडून मरणोत्तर नेत्रदान
बुलढाणा, दि. 8 (जिमाका) : शेगाव येथील टावरी
परिवाराने समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे कार्य घडवून आणत मरणोत्तर नेत्रदानाचा
आदर्श घालून दिला आहे. येथील ज्येष्ठ नागरिक दिवंगत रामगोपाल टावरी (वय 80 वर्षे)
यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.
ही प्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यासाठी जिल्हा
नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रवी शिंदे, डॉ. अमोल उगले, नेत्रसमुपदेशक
योगेश सिरसाट व सौरभ हिवाळे यांनी समन्वय साधत संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या
पूर्ण केली.
या कार्यामुळे समाजात टावरी कुटुंबाचे कौतुक होत असून विविध
स्तरांतून त्यांचा गौरव केला जात आहे. दिवंगत रामगोपाल टावरी यांच्या
इच्छापूर्तीमुळे अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्यास व कुटुंबाच्या निर्णयास दाद
दिली आहे. नेत्रदानामुळे गरजू व्यक्तींना नवीन दृष्टी लाभणार असून समाजात एक आदर्श
निर्माण केला आहे.
नेत्रदानाच्या या उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळण्याची संधी
उपलब्ध होणार असून, टावरी परिवाराने केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत
आहे.
000000

Comments
Post a Comment