नवरात्रोत्सवात अन्न पदार्थातून विषबाधा टाळा !


Ø अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना जारी

बुलढाणा, दि. १९ (जिमाका) : नवरात्रीच्या काळात नागरिेकांना अन्न पदार्थातून विषबाधा होवू नये या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन विभागाकडून  करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवात भाविकांकडून उपवास ठेवले जातात. उपवासाचा पदार्थ म्हणून नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात भगर अथवा भगरीच्या पदार्थाचे सेवन केल्या जाते. भंडाऱ्यामध्ये प्रसाद म्हणून भगरीची खिचडी वाटप केली जाते. मात्र, भगरीबाबत योग्य काळजी न घेतल्यास अन्न पदार्थातून विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे.

भगरी व भगर पासून बनवलेली उपवासाची खिचडी किंवा भाकरी इ. पासून अन्न विषबाधा होऊ नये यासाठी खबरदारी कशी घ्यावी, याबाबत दिलेल्या सूचनांनुसार भगरीसाठी वापरले जाणारे धान्य फक्त परवाना धारक व नोंदणीकृत विक्रेत्याकडून खरेदी करावे. धान्य स्वच्छ, बुरशीविरहित व कीडरहित असावे. धान्य दळताना/कुटताना स्वच्छ गिरणी किंवा यांत्रिक पद्धत वापरावी. आयत्या पिठाचा वापर करण्याऐवजी भगर दळून ताज्या पिठाचा वापर करावा आयते पीठ घ्यावयाचे असल्यास केवळ कंपनीने तयार केलेले पॅक पॅकेटचा वापर करावा. त्यावरील वापराची अंतीम तारीख बघून घ्यावी. भगरी शिजवण्यासाठी स्वच्छ व उकळलेले पाणी वापरावे. अर्धवट शिजलेली भगरी खाणे टाळावे, कारण त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. शिजवताना व शिजल्यानंतर भगरीवर माशा/धूळ बसू नये याची काळजी घ्यावी.

साठवणूक व वितरण कसे करावे :

भगरी गरम ठेवूनच वाटप करावी.  थंड झाल्यास जंतूंची वाढ होण्याची शक्यता असते. ४ तासांपेक्षा जास्त वेळ भगरी साठवून ठेवू नये. शिळ्या भगरीमुळे प्रकृतीस अपाय होण्याचा धोका उद्भवतो. वितरणासाठी स्वच्छ व बंद डब्यांचा/भांड्यांचा वापर करावा. प्रसाद वाटपाच्या ठिकाणी पेयजल व हात धुण्याची व्यवस्था असावी.

खाद्य हाताळणाऱ्यांनी घ्यावयाची काळजी :

जे लोक भगरी बनवतात किंवा वाटतात त्यांनी हात स्वच्छ धुवावे, नखे कापलेली ठेवणे, टोप्या व हातमोजे वापरणे बंधनकारक करावे. सर्दी, ताप, जुलाब, त्वचारोग असलेल्या आजारी व्यक्तींनी अन्न हाताळू नये. अशा सूचना तथा आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

जनजागृतीसाठी मंडळे, स्वयंपाक समिती व जनतेमध्ये योग्य सूचना फलक लावावेत. स्थानिक आरोग्य व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी करून मार्गदर्शन करावे.

विक्रेते, दुकानदार यांनी घ्यावयाची काळजी :

भगर धान्य कोरड्या, हवेशीर व आर्द्रतामुक्त ठिकाणी साठवावे. पॅकिंग करताना स्वच्छ व फूड-ग्रेड पॅकिंग साहित्य वापरावे. पॅकेटवर उत्पादन दिनांक, बेस्ट बिफोर दिनांक, FSSAI क्रमांक स्पष्टपणे लिहावे. परवाना धारक वितरक किंवा उत्पादक यांच्याकडूनच माल खरेदी करावा. भगरी अथवा धान्य जमिनीला न लागता झाकून व उंचावर ठेवावे. दुकानात ओलावा, उंदीर, झुरळ, कीड यांचा प्रादुर्भाव होऊ नये. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य पद्धतीने विक्री करावी. जुनी भगर, ओलसर, कालबाह्य व बुरशी लागलेली भगर विक्रीस ठेवू नये. वजनकाटे, मापे व पॅकिंग स्वच्छ ठेवावे. प्रत्येक दुकानदाराने खरेदी आणि विक्रीचा सर्व तपशील (खरेदी बिले, साठा नोंदवही) सांभाळून ठेवावी.

ग्राहकांना देताना ग्राहकांना स्वच्छ पिशवी किंवा डब्यातच वस्तू द्यावी. सैल भगरी देताना ओले हात लावू नयेत. आवश्यकतेनुसार ग्राहकांना साठवण व शिजवणुकीबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना तथा आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या