श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सवाला परवानगी ; जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा आदेश जारी
बुलढाणा, दि. 25 : देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सव आणि यात्रा उत्साहात साजरी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.
या संदर्भात श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजा यांनी परवानगीसाठी अर्ज केला होता. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून उत्सव घेण्यास हरकत नसल्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांच्या अहवालाच्या आधारे ही परवानगी देण्यात आली आहे.
ही परवानगी काही अटी व शर्तींच्या आधारे देण्यात आली असून त्यानुसार हा आदेश २२ सप्टेंबर ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मर्यादित राहील. यात्रेत कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी आवश्यक राहील आणि मध्यरात्री 12 वाजेनंतर व्यवसाय सुरू ठेवता येणार नाही. चेंगराचेंगरी किंवा जिवीतहानी टाळण्यासाठी संस्थानने मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक नेमणे बंधनकारक असेल. प्रसाद वाटपासाठी रांग व बॅरिकेडींगची व्यवस्था करण्यात यावी. वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य ती स्वतंत्र व्यवस्था करून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.मिरवणुकीत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये तसेच मिरवणुकीत सहभागी होऊ नये, यासाठी आयोजन संस्थेने विशेष दक्षता घ्यावी.भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आखलेल्या योजनेची प्रत पोलीस विभागाकडून मंजूर करून घेणे बंधनकारक असेल. सर्व सुविधा आणि व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी आयोजन संस्थेची राहील.
उत्सवातील कार्यक्रम:
घटस्थापना 22 सप्टेंबर 2025 (सोमवार), मंडपोत्सव: 30 सप्टेंबर 2025 (मंगळवार), दसरा पालखी मिरवणूक 1 ऑक्टोबर 2025 (बुधवार मध्यरात्रीपासून) व 2 ऑक्टोबर 2025 (गुरुवारपर्यंत), लळीत उत्सव: 10 ऑक्टोबर 2025 (शुक्रवार सूर्योदय 5.45वाजता), कार्तिक उत्सव 22 ऑक्टोबर 2025 ते 16 नोव्हेंबर 2025
श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment