महसूल विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश
बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : महसूल विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज
घेतला. शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनाचा लाभ तसेच जिल्ह्यासाठी दिलेले उद्दिष्ट
वेळेत पूर्ण करा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना
दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात महसूल
विभागाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी
सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिलहाधिकारी समाधान गायकवाड, उपविभागीय
अधिकारी शरद पाटील, तहसिलदार विजय सवळे तसेच ऑनलाईनव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी व
तहसिलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना
शासनाच्या योजनासह अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे मिळणाऱ्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण
करणे अत्यावश्यक आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. तसेच
ॲग्रीस्टॅकची नोंदणी प्राधान्याने करुन घ्यावी. सेवा पंधरवाडा अभियानातंर्गत दि.
26 व 27 सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे. शिबिरामध्ये शासनाच्या
योजनांचा लाभ, ई-केवायसी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, महसुली दाखले वितरण तसेच नागरिकांचे प्रलंबित
प्रकरणांचे तात्काळ निवारण करण्यात यावे.
जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे
नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. अवेळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे
झालेल्या नुकसानीचे शासनाव्दारे प्राप्त झालेला मदतनिधी तात्काळ वितरीत करावे.तसेच
शेतजमिनी भोगवटदार दोनमधून भोगवटदार एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न करावेत.
घरकुलाचे प्रकरणे तातडीने निकाली काढावीत व नागरिकांना नियमानुसार घरांसाठी वाळू उपलब्ध
करुन द्यावी. सर्व तहसीलदारांनी गौण खनिज चोरीच्या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन
दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश डॉ. किरण पाटील यांनी यावेळी दिले.
आढावा बैठकीमध्ये जिंवत सातबारा, ई-चावडी ऑनलाईन
वसूली, गाव नकाशा नोंदणी, पांदण रस्ता, ॲग्रिस्टॅक, घरकुल योजना, सेवा पंधरवाडा, ई-हक्क
प्रणाली, ई फेरफार, ई पीक पाहणी, महसूल वसुली, गौण खनिज महसूल वसुली, न्यायप्रविष्ट
प्रकरणे, इ. विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला.



Comments
Post a Comment