नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकऱ्यांसाठी 121 कोटींच्या मदत निधीस मंजूरी - आतापर्यंत 219 कोटी 70 लाख रुपयांची मदत - पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची माहिती

 


 

बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या 1 लाख 80 हजार 368 शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी 121 कोटी 89 लाख 43 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय 23 सप्टेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपोटी जिल्ह्यातील बाधितांना 219 कोटी 70 लाख 82 हजार रुपये इतका मदत निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथ‍ा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.

 

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत निधीला मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती याप्रमाणे.

 

यापुर्वी 22 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार अवेळी पाऊसामुळे बाधित 14 हजार 909 शेतकऱ्यांना 15 कोटी 55 लाख 50 हजार रुपये इतका मदत निधीस मान्यता दिली आहे. तसेच 6 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित 90 हजार 383 शेतकऱ्यांना 74 कोटी 45 लाख 3 हजार रुपये इतका निधी तर 17 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित 8 हजार 397 शेतकऱ्यांना 7 कोटी 80 लाख 86 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आज दि. 23 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरामुळे बाधित 1 लाख 80 हजार 368 शेतकऱ्यांना 121 कोटी 89 लाख 43 हजार रुपये निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन संवेदनशील

 

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून सद्या बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टी झाल्याचे निदर्शनास आले असून या नुकसानग्रस्त भागातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पिकांचे तत्काळ पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच यापूर्वी झालेल्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांचे तातडीने पंचनामे केल्याने बाधित शेतकऱ्यास दिलासा मिळाले आहे, अशी भावना मदत व पुनर्वसन मंत्री तथ‍ा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी व्यक्त केली.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या