फसव्या भरती संदेशापासून सावधान; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन
बुलढाणा, दि. 23 (जिमाका): मेहकर
तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक व इतर पदांवर
कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे, अशा आशयाचे फसवे मेसेज व्हॉटॲप व सोशल मीडियावर
वेगाने प्रसारित होत आहेत. बेरोजगार युवक-युवतींना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करण्याचा
प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले असून अशा फसव्या संदेशावर विश्वास ठेवू नये व फसवणूकीला
बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व तालुका आरोग्य अधिकारी
डॉ. विजय बलकार(मेहकर) यांनी केले आहे.
आरोग्य
विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत कोणतीही भरती प्रक्रिया सध्या सुरू नाही. तसेच
अशा प्रकारची अधिकृत जाहिरातही जारी केलेली नाही. त्यामुळे अशा फसव्या संदेशाला बळी
पडू नका. आरोग्य विभागातील किंवा इतर सरकारी भरतीच्या जाहिराती फक्त अधिकृत संकेतस्थळावर
किंवा वर्तमानपत्रांतच प्रसिद्ध केल्या जातात.
संशयास्पद संदेश आढळल्यास तात्काळ संबंधित प्रशासनास कळवावे. बेरोजगार उमेदवारांची
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे
स्पष्ट केले आहे.
0000
Comments
Post a Comment