जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला विशेष लसीकरण मोहीम; सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करा- जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 


बुलढाणा, दि. 3 (जिमाका): आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये गोवर व रुबेला प्रतिबंधात्मक विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 15 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना गोवर व रुबेला लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य अधिकारी व प्रशासनाची पूर्ण तयार झाली असून लसीकरणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच जिल्हा लसीकरण टास्क फोर्स समिती, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती तसेच पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी प्रवीण घोंगटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणजीत मंडाले, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, अल्पसंख्यांक विभाग, आदिवासी विभाग यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरशांमधील विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करणे, आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती, प्रशिक्षण तसेच सूक्ष्म कृती आराखड्याचे नियोजन अशा विविध विषयाचा आढावा घेऊन  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच नगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. या विशेष मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना गोवर व रुबेला सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळणार असून, राज्यातील मुलांचे आरोग्य सुदृढ व सुरक्षित होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या