2721 भूमिहीनांना मंजूर घरकुलासाठी हक्काची जागा · सेवा पंधरवडाअंतर्गत भूमिहीन मंजूर घरकुल लाभार्थ्यांना 16.34 हेक्टर जमीन उपलब्ध
बुलढाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): महसूल विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज मास्टर अभियान” अंतर्गत जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा राबविण्यात
येत आहे. या सेवा पंधरवड्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 2721 भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना एकूण 16.34 हेक्टर जागा
उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे
जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी हक्काची जागा मिळण्याचा मार्ग सुकर झाला
आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा उद्देश महसूल व वन विभाग
तसेच इतर संबंधित विभागांमध्ये प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करणे आहे.
या उपक्रमात “सर्वांसाठी घरे 2025” योजनेखाली भूमिहीन घरकूल लाभार्थ्यांना
शासन निर्णयानुसार शासकीय जमिनींचे हस्तांतरण जिल्हा प्रशासनाकडून संबंधित स्थानिक
स्वराज्य संस्थांना करण्यात आले आहे.
शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून
रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र
असलेल्या कुटूंबांना जागा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार चिखली तालुक्यातील
404 भूमिहीन घरकूल लाभार्थ्यांना 3.09 हेक्टर, देउळगाव राजा तालुक्यातील 145 लाभार्थ्यांना
0.75 हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यातील 142 लाभार्थ्यांना 2.84 हेक्टर, खामगाव तालुक्यातील
262 लाभार्थ्यांना 1.21 हेक्टर, लोणार तालुक्यातील
154 लाभार्थ्यांना 0.72 हेक्टर, मलकापूर तालुक्यातील 706 लाभार्थ्यांना 3.27 हेक्टर,
मेहकर तालुक्यातील 74 लाभार्थ्यांना 0.35 हेक्टर, मोताळा तालुक्यातील 302 लाभार्थ्यांना
0.85 हेक्टर, नांदुरा तालुक्यातील 262 लाभार्थ्यांना 1.59 हेक्टर,
संग्रामपूर तालुक्यातील 136 लाभार्थ्यांना 0.87 हेक्टर, शेगाव तालुक्यातील
29 लाभार्थ्यांना 0.3 हेक्टर, तर सिंदखेड राजा तालुक्यातील 105 लाभार्थ्यांना 0.5 हेक्टर
अशा एकूण 2721 भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना 16.34 हेक्टर जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
सेवा पंधरवडा ‘सर्वांसाठी घरे’
या उपक्रमाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात भूमिहीन घरकुल लाभार्थी यांना
उपरोक्त प्रमाणे जिल्हा महसूल प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे
भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
000
Comments
Post a Comment