अण्णासाहेब पाटील यांची ९२ वी जयंती महामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात साजरी
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात गुरुवार, दि. २५
सप्टेंबर रोजी माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक व मराठा आरक्षण चळवळीचे जनक, मराठा
क्रांतीसूर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
करण्यात आले.
या
कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक
आयुक्त गणेश बिटोडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा
समन्वयक वैभव मुंढे, जिल्हा समन्वयक सूरज जगताप, तसेच संजीवनी नाईकवाडे, सविता
वाकोडे, संतोष पडघान, सतिश शेळके, राहुल सुरडकर, सचिन पवार, गोपाल चव्हाण, योगेश
लांडकर, शुभम पवार, आकाश जाधव, रितेश निंबाळकर यांसह कार्यालयातील अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील यांचे कार्य व
योगदान
अण्णासाहेब
पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी युनियनची स्थापना करून कामगारांच्या हक्कासाठी
ऐतिहासिक चळवळ उभारली. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना करून मराठा
समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य केले. मराठा समाजाला आरक्षण
मिळावे यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण करून बलिदान दिले.
त्यांच्या
स्मरणार्थ राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना
केली असून, आजतागायत या महामंडळाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महामंडळाची यशस्वी वाटचाल
- महाराष्ट्रातील एकूण लाभार्थी: १,५५,०४३
- बँकेमार्फत वितरित कर्ज मंजुरी रक्कम: ₹१३,२५४.०८ कोटी
- व्याज परतावा वितरित रक्कम: ₹१,३११.३० कोटी
महामंडळामार्फत
लाभार्थींना व्यवसायाच्या माध्यमातून व्याज परताव्याच्या स्वरूपात थेट आर्थिक
सहाय्य दिले जात असून, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागास वर्गाच्या विकासासाठी
सातत्याने काम सुरू आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी अण्णासाहेब पाटील
यांच्या कार्याची उजळणी केली आणि त्यांचे विचार समाजात पोहोचवून त्यांच्या
स्वप्नातील प्रगत आणि सक्षम समाज उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
000


Comments
Post a Comment