मुलींनी एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा : गुलाबराव खरात
मुलींनी एचपीव्ही लसीकरणाचा
लाभ घ्यावा : गुलाबराव खरात
गर्भाशय मुखाच्या
कर्करोगापासून संरक्षणासाठी पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. ३१ (जिमाका) : महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी
एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण अत्यंत उपयुक्त आहे. बुलढाणा जिल्ह्यात
मार्च २०२६ पासून एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेत १४ ते १५
वर्षे वयोगटातील पात्र मुलींना एचपीव्ही लस देण्यात येत आहे. पालकांनी आपल्या
मुलींना या लसीकरणाचा लाभ देऊन त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एचपीव्ही
संसर्गामुळे होऊ शकतो. या आजारापासून प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण हा प्रभावी
प्रतिबंधात्मक उपाय आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात
ही मोहीम राबविण्यात येत असून, शाळा, अंगणवाडी केंद्रे तसेच शासकीय आरोग्य
संस्थांच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे.
पात्र मुलींना लस मिळावी यासाठी आरोग्य
विभागातील अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका सक्रियपणे कार्यरत
आहेत. पालकांनी आपल्या मुलींना जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत किंवा शाळेत आयोजित
लसीकरण सत्रात घेऊन जाऊन एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. रणजीत मंडाले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी
केले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे
आवाहन
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा, अपुरी
अथवा नकारात्मक माहितीवर विश्वास न ठेवता शासनाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात
येणाऱ्या अधिकृत मार्गदर्शनानुसार पात्र मुलींचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे
आवाहन प्रशासनाने केले आहे.
“मुलींचे आजचे लसीकरण म्हणजे
त्यांच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे. पालकांनी
पुढाकार घेऊन आपल्या मुलींना एचपीव्ही लसीकरणाचा लाभ द्यावा,” असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment