सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळा संपन्न नागापूर येथे सोयाबीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन; प्रक्षेत्र भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन

 





 

बुलढाणा, दि. 7(जिमाका): डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२६ अंतर्गत सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिक, शेतकरी प्रशिक्षण, चर्चासत्र तसेच प्रक्षेत्र भेटीचे आयोजन नागापूर (ता. मेहकर) येथे करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत शेती शाळेचा तिसरा वर्गही घेण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाण्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे होते. मार्गदर्शन करताना त्यांनी सोयाबीन पिकाच्या व्यवस्थापनात उत्पादनवाढीसोबत मृदा आरोग्य सुधारण्यावरही भर देण्याचे आवाहन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जैविक निविष्ठांचा शास्त्रोक्त वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पीकविषयक विविध शंकांचे निरसन करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.

 

मंडळ कृषी अधिकारी राजूरकर, उपकृषी अधिकारी धांडे, सहाय्यक कृषी अधिकारी जंजाळ, तंत्र अधिकारी विजय सरोदे तसेच समूह सहाय्यक अजय खराटे यांनी तेलबिया पिकांचे व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाला नागापूरच्या सरपंच कल्पनाबाई समाधान गायकवाड, कृषी सखी चैताली धाबे, महिला बचत गटांच्या सदस्यांसह प्रगतिशील शेतकरी व महिला शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

 

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाण्याचे विषय विशेषज्ञ डॉ. वाडकर यांनी सामूहिक पीक प्रात्यक्षिकाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. गावस्तरावर पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सामूहिक पद्धतीने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन वाढीसोबतच उत्पादन खर्चात बचत आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आयोजित शेती शाळेच्या तिसऱ्या वर्गामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील मर रोग व चक्रीभुंगा या प्रमुख कीड-रोगांची ओळख, व्यवस्थापन आणि नियंत्रणाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. पिकांची नियमित पाहणी करून आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊनच आवश्यकतेनुसार कीडनियंत्रणाच्या उपाययोजना व फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष शेतामध्ये पीक निरीक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना देण्यात आले.

 

कार्यक्रमादरम्यान कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पिकांमध्ये उद्भवलेल्या समस्यांवर शास्त्रोक्त उपाय सुचविण्यात आले. प्रत्यक्ष शेतावर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांनी विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमास गणेश धाबे, पवन धाबे, सुधाकर धाबे, विलास धाबे, नंद गायकवाड, समाधान गायकवाड, नंदकिशोर किल्लारी, इलियास खान यांच्यासह नागापूर गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा तसेच गावातील शेतकरी बांधवांनी सहकार्य केले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या