सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन
बुलढाणा,दि. 12 (जिमाका):
सोयाबीन पिकावर मोझॅक व पिवळा
मोझॅक या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडींचे वेळीच व्यवस्थापन
केल्यास होणारे नुकसान कमी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा
अवलंब करावा, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले
आहे.
मोझॅक रोगाची लक्षणे व प्रसार : या रोगामुळे सोयाबीनची वाढ खुंटते.
पाने आकसलेली, लहान, जाडसर व सुरकुतलेली दिसतात. परिणामी शेंगांचे प्रमाण लक्षणीयरीत्या
घटते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने खोडकिडीमार्फत तसेच दूषित बियाण्यांमधून होतो.
पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे व प्रसार : या रोगामध्ये पानांचा काही भाग
हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.
पांढऱ्या माशीमार्फत या रोगाचा प्रसार वेगाने होतो.
रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन : शेतात सुरुवातीस रोगग्रस्त झाडे आढळल्यास
ती तात्काळ उपटून शेताबाहेर नष्ट करावीत. पिकातील तसेच बांधावरील तणांचे पूर्णपणे नियंत्रण
करावे. उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी १५ × ३० सें.मी. आकाराचे पिवळे चिकट सापळे प्रति
एकर १० या प्रमाणात पिकाच्या उंचीनुसार लावावेत.
उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
विषाणूचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशी व मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रति १० लिटर
पाण्यात फ्लुनिकामीड ५० टक्के डब्ल्यू.जी. ३ ग्रॅम किंवा थायोमिथोक्साम २५ टक्के डब्ल्यू.जी.
४ ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी
रोगाची लक्षणे दिसताच वेळीच उपाययोजना करून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखावा, असे
आवाहन कृषि विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment