अवयवदान जनजागृती पंधरवड्यानिमित्त बुलढाण्यात भव्य जनजागृती रॅली व पथनाट्य






बुलढाणा दि. 14 (जिमाका): अवयवदान जनजागृती पंधरवड्यानिमित्त आज बस स्थानक परिसर, बुलढाणा येथे ASPM आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, बुलढाणा व आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.

भारतात दरवर्षी ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान जनजागृती पंधरवडा पाळला जातो. १३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन म्हणून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करणे, मृत्यूनंतर अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे आणि अधिकाधिक नागरिकांना अवयवदानाची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी व सहभागी नागरिकांनी अवयवदान करा, जीवनदान द्या, मृत्यूनंतरही कोणाला तरी जीवनाची नवी आशा द्या अशा संदेशांचे फलक हातात घेऊन जनजागृती केली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व, त्याबाबतचे गैरसमज आणि मृत्यूनंतर अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणारे जीवनदान याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.

नागरिकांनी अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा तसेच आपल्या कुटुंबीयांमध्ये आणि समाजातही याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार जिल्हा सार्वजनिक सुश्रुषा अधिकारी श्री. अनंत वायझाडे यांच्यासह नेत्र विभागातील आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, ASPM आयुर्वेद कॉलेजमधील प्राध्यापक व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवयवदान हा मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारा मानवतेचा महान संकल्प आहे. चला, अवयवदानाचा संकल्प करूया आणि अनेकांना जीवनदान देऊया, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या