अवयवदानासाठी नागरिकांनी पुढे यावे; बुलढाण्यात जनजागृती अभियान
बुलढाणा, दि.
7(जिमाका): अवयवदान
पंधरवडा २०२६ निमित्त जिल्हाभर जनजागृती उपक्रमांना वेग आला असून शुक्रवारी जिल्हा
पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय तसेच बुलढाणा बस स्थानक येथे अवयवदान
जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून
देत ऑनलाइन प्रतिज्ञा नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या
मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात पोलीस अधीक्षक, जिल्हा कोषागार अधिकारी तसेच
बस स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार यांची भेट
घेऊन अवयवदानाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. समाजात अवयवदानाबाबत असलेले गैरसमज
दूर करून मृत्युपश्चात अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, याबाबत
उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना क्यूआर
(QR) कोड स्कॅन करून ऑनलाइन अवयवदान प्रतिज्ञा नोंदणी करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष
दाखविण्यात आली. अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने अवयवदानाचा संकल्प करून या जीवनदायी
चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुतडमल तसेच नेत्र
समुपदेशक योगेश शिरसाट यांनी उपस्थितांचे समुपदेशन करत अवयवदानाचे सामाजिक आणि मानवी
मूल्य अधोरेखित केले. कार्यक्रमास संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी, वाहन
चालक, बस स्थानकावरील कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
"अवयवदान हा मृत्यूनंतरही दुसऱ्याला नवजीवन देणारा
सर्वोच्च मानवतावादी संकल्प आहे. चला, आपणही अवयवदानाचा संकल्प करूया," असा संदेश
देत उपस्थितांना अवयवदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
00000
Comments
Post a Comment