स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

 

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

 

बुलढाणा, दि. 18 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नूतनीकरण (Renewals) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील संबंधित विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

 

शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असलेल्या, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आणि अन्य आवश्यक सुविधांसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.

 

जिल्हा व तालुका स्तरावर शिक्षण घेणाऱ्या नूतनीकरण (Renewals) विद्यार्थ्यांनी योजनेच्या निकषांनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे. मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनीच नूतनीकरणासाठी अर्ज करावा.

 

स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी संबंधित कार्यालयांच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण अर्ज तालुका किंवा जिल्हास्तरावरील संबंधित वसतिगृहात जमा करावा. ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा. मुदत संपण्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या