इंडिया स्किल कॉम्पिटिशनमध्ये युवकांना कौशल्य सादरीकरणाची संधी
बुलढाणा,दि. 12 (जिमाका): शिक्षणापेक्षा कौशल्याला प्राधान्य देत युवकांना
आपल्या अंगभूत कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी इंडिया स्किल कॉम्पिटिशन (India
Skills Competition) २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया
सुरू झाली असून जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होणार आहे. बुलडाणा
जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील कौशल्यवान युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे
यांनी केले आहे.
या स्पर्धेत एकूण ६३ कौशल्य क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
वीट बनविणे, मातीकाम, रंगकाम, शेती, दागिने निर्मिती, राजमिस्त्री काम, फॅशन टेक्नॉलॉजी,
छायाचित्रण, चित्रकला, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, इलेक्ट्रॉनिक्स,
वेल्डिंग, बेकरी, सौंदर्यशास्त्र, आरोग्य व सामाजिक कार्य, हॉटेल व्यवसाय, सायबर सिक्युरिटी,
डिजिटल कन्स्ट्रक्शन, माहिती तंत्रज्ञान, दंत चिकित्सा आदी विविध कौशल्यांचा यामध्ये
समावेश आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेची कोणतीही
अट नाही. कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या प्रत्यक्ष कौशल्याच्या आधारे सहभागी होता
येणार आहे. ५६ कौशल्य क्षेत्रांसाठी स्पर्धकाचा जन्म १ जानेवारी २००६ नंतरचा, तर सात
कौशल्य क्षेत्रांसाठी १ जानेवारी २००३ नंतरचा असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया : स्पर्धेत सहभागी होण्यासाठी Skill India
Digital संकेतस्थळावर अर्ज करावा. अर्ज करताना प्रथम मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे
पडताळणी करावी लागेल. त्यानंतर आधार क्रमांक, शैक्षणिक माहिती आणि कौशल्यासंबंधी आवश्यक
माहिती भरून अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर स्पर्धकाची नोंदणी पूर्ण
होईल.
बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण भागात तसेच कमी शिक्षण घेतलेल्या अनेक युवकांकडे
विविध प्रकारचे कौशल्य आहे. त्यामुळे शिक्षण कमी असल्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्याबाबत
कोणताही गैरसमज बाळगू नये. आपले कौशल्य हीच आपली ताकद असून त्याला राष्ट्रीय स्तरावर
सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना अडचण येणाऱ्या युवकांनी बस स्थानक परिसरालगत असलेल्या
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
येथे अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील
जास्तीत जास्त पात्र युवकांनी इंडिया स्किल कॉम्पिटिशनमध्ये नोंदणी करून आपल्या कौशल्याला
व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment