‘नकाशा’प्रकल्पांतर्गत प्रारूप नकाशा व चौकशी नोंदवहीचे प्रसिद्धीकरण; बुलढाणा नगर परिषदेत नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध

 

 ‘नकाशाप्रकल्पांतर्गत प्रारूप नकाशा व चौकशी नोंदवहीचे प्रसिद्धीकरण;

बुलढाणा नगर परिषदेत नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध

 

बुलढाणा, दि. १७ (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP) अंतर्गत स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील जमिनीचे GIS आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी नकाशा (National Geospatial Knowledge Based Land Survey of Urban Habitations(NAKSHA)) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आलेल्या १० स्थानिक प्राधिकरणांमध्ये बुलढाणा नगर परिषदेचा समावेश आहे.

 

 

या प्रकल्पांतर्गत बुलढाणा नगर परिषद हद्दीतील मिळकतींचे नगर भूमापन करण्याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी २९ जुलै २०२५ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी, प्रकल्प व्यवस्थापक व कर्मचारी तसेच नगर परिषद प्रतिनिधी यांनी मिळकतींना प्रत्यक्ष भेटी देऊन ३० सप्टेंबर २०२५ पासून नकाशा प्रकल्पाच्या कामास सुरुवात केली.

 

नगर भूमापन चौकशीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रारूप नकाशा व प्रारूप चौकशी नोंदवहीचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. बुलढाणा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पुजा संजय गायकवाड, आमदार संजय रामभाऊ गायकवाड, गटनेते कुणाल संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, सर्व विषय सभापती तसेच नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विनायक कांगले, नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, उपमुख्याधिकारी योगेश सावळे, नगर रचनाकार प्रियंका पाटील, मिळकत व्यवस्थापक दिपा मापारी, लेखा परीक्षक किरण वानखेडे, लेखापाल आशिष कोकाटे, कर अधीक्षक उमेश काकड यांच्यासह प्युअरवेझ इन्फ्रा प्रा. लि.चे अधिकारी व कर्मचारी तसेच भूमी अभिलेख विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

या प्रकल्पासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे शैलेश नवाळ (भा.प्र.से.), उपआयुक्त व सहसंचालक भूमी अभिलेख (नागरी भूमापन) पुणे हेमंत विठ्ठलराव निकम तसेच उपसंचालक भूमी अभिलेख, अमरावती प्रदेश राजेंद्र मुंदक गोठे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

प्रसिद्ध करण्यात आलेला प्रारूप नकाशा व प्रारूप चौकशी नोंदवही बुलढाणा नगर परिषद तसेच नगर भूमापन अधिकारी, बुलढाणा यांच्या कार्यालयात नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नकाशा व नोंदवहीबाबत कोणाला हरकत अथवा सूचना असल्यास प्रसिद्धीच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत नगर भूमापन अधिकारी, बुलढाणा यांच्याकडे सादर कराव्यात.

 

प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या नोंदींच्या आधारे बुलढाणा शहरातील मिळकतींच्या भूमापन नोंदी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होणार असून, नागरिकांना त्यांच्या मालमत्तेशी संबंधित अभिलेख अधिक सुस्पष्ट स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या