शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा दि. 14
(जिमाका): इतर
मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृह योजनेसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७
मध्ये व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी
या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण
विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
१२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नव्याने प्रवेशित
विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेशाकरिता ७
ऑगस्ट २०२६
ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
अर्जांची छाननी १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६
दरम्यान करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर २०२६
रोजी पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवडीनुसार प्रवेशाची अंतिम
मुदत २१ सप्टेंबर २०२६ असून, रिक्त जागांवर
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी दुसरी निवड यादी ७
सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक देण्यात आले आहे.
संबंधित विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
बुलढाणा
जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये ७५ जागा रिक्त
बुलढाणा येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात
विविध प्रवर्गातील एकूण ५३ जागा रिक्त आहेत. यामध्ये इतर मागास वर्ग
(इमाव) १८, विजाभज २१, विमाप्र ४, दिव्यांग ४, अनाथ २ आणि आर्थिक मागास प्रवर्ग
(EWS) ४ जागांचा समावेश आहे.
तसेच मुलांच्या शासकीय वसतिगृहात
एकूण २२ जागा रिक्त आहेत. यामध्ये इमाव ५,
विजाभज ४, विमाप्र ५, दिव्यांग ४, अनाथ २ आणि EWS प्रवर्गातील २ जागांचा समावेश
आहे.
अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही शासकीय
वसतिगृहांमध्ये एकूण ७५ जागा रिक्त आहेत.
ऑनलाइन अर्ज कुठे करावा?
शासकीय वसतिगृहातील प्रवेश
प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org
या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे
व माहिती अचूकपणे सादर करून विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन
सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment