डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर
बुलढाणा
दि. 14 (जिमाका): अनुसूचित जाती
व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नूतनीकरण (Renewal) अर्ज
करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी
मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र ठरूनही प्रवेश
न मिळालेल्या किंवा वसतिगृहासाठी नियमित अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास,
शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आणि इतर आवश्यक सुविधांसाठी आर्थिक सहाय्य थेट आधार
संलग्न बँक खात्यात जमा करण्याची तरतूद या योजनेत आहे. ही योजना इयत्ता ११ वी, १२ वी
तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी
लागू आहे.
जिल्हा व तालुका स्तरावर शिक्षण घेणाऱ्या पात्र
विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. मात्र,
मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाच नूतनीकरणासाठी
अर्ज करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वाधार
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध
असून, अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. पूर्ण भरलेला अर्ज संबंधित
तालुका किंवा जिल्हास्तरीय शासकीय वसतिगृहात जमा करावा. ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक
अडचणी आल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे
आवाहन सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment