राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार खेळाडूंनी 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करण्याचे आवाहन
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा
होणार सत्कार
खेळाडूंनी 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रांच्या प्रती सादर
करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्रातील
क्रीडा संस्कृतीची जोपासना तसेच जनतेमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याच्या
उद्देशाने हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट हा
दिवस देशभरात ‘राष्ट्रीय क्रीडा
दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून बुलढाणा
जिल्ह्यात दि. २८ ते ३१ ऑगस्ट
२०२६ या कालावधीत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार
आहे. या कालावधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार तसेच विविध क्रीडा
स्पर्धांचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा
यांच्या वतीने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित
करण्यात येणार आहेत. यामध्ये स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन,
त्यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार,
मान्यवरांचे खेळाडूंना मार्गदर्शन तसेच विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.
खेळाडूंनी
प्रमाणपत्रांच्या प्रती सादर कराव्यात : दि. १
जून २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शालेय
किंवा अधिकृत एकविध क्रीडा संघटनेमार्फत आयोजित अधिकृत राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय
क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या किंवा सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी
आपल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा
क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे दि.
२८ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावी.
दि. २८ ऑगस्टनंतर प्राप्त होणारे अर्ज
स्वीकारले जाणार नाहीत. पात्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार
आहे. तसेच क्रीडा दिनाचा नियोजित कार्यक्रम अर्जासोबत नमूद केलेल्या संपर्क
क्रमांकावर कळविण्यात येईल. सन २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत
सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपली नोंदणी करून प्रमाणपत्र सादर करावे,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment