जिल्हास्तरीय कार्यशाळेत नव्या क्रीडा स्पर्धा प्रणालीचे प्रशिक्षण

 


बुलढाणा, दि. 6 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ पासून शालेय क्रीडा स्पर्धांसाठी लागू करण्यात येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाधारित प्रणालीबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील सुमारे ६५० शारीरिक शिक्षण शिक्षक व संगणक चालकांनी सहभाग नोंदविला.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर तसेच तालुका संयोजक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. मेजर ध्यानचंद, ऑलिम्पियन खाशाबा जाधव आणि बॅरन पियरे द कुबर्टीन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कारही करण्यात आला.

प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सन २०२६-२७ मधील क्रीडा स्पर्धांचे नियोजन, आयोजन तसेच नव्या ऑनलाइन तंत्रज्ञान प्रणालीचा वापर याबाबत उज्वला लांडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत नव्या तंत्रज्ञान प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जीवन मोहोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप केळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद गायकवाड, सागर इंगळे आणि सुहास राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या