जलसंधारण दिन विशेष लेख - वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

 जलसंधारण दिन विशेष लेख                                           

 

वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न

विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

 

विदर्भ म्हणजे दुष्काळी प्रदेश, विदर्भ म्हणजे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा प्रदेश असे सारे नकारात्मक बोलले जात असताना आता हाच विदर्भ येत्या काळात सुजलाम- सुफलाम असा संपन्न प्रदेश होणार आहे. या प्रदेशावरील नकारात्मकतेचा हा डाग पुसून काढण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि जिद्दीने वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने त्यांनी पावले उचलली. प्रामुख्याने कोरडवाहू शेती असलेल्या विदर्भात पावसाच्या अनियमिततेमुळे निसर्गावर अवलंबून असलेली शेती तोट्यात येते आणि बळीराजा संकटात  सापडतो. गेले कित्येक वर्षे हे असेच सुरू आहे. त्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते. दोन टोकांवरील दोन नद्या जोडणे हा त्यावर उपाय होता मात्र हे आव्हान सोपे नव्हते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शिवधनुष्य उचलले. त्यामुळेच एक आधुनिक जलक्रांती या प्रकल्पामुळे होणार आहे. ९४ हजार ९६७.६६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी ३१ हजार ४९४ हेक्टर जमीन आवश्यक आहे.  गोसीखुर्द प्रकल्पात पावासाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी नळगंगा नदीकडे वळविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात फक्त सत्तर दिवस गोसीखुर्द धरणामधून पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवून त्याद्वारे विदर्भाचे दुसरे टोक सुजलाम सुफलाम करण्याचा हा भगिरथ प्रयत्न आहे. यात गोसीखुर्दमधून ६३.७३ टीएमसी पाण्याची उचल करण्यात येईल व ते पाणी शेती, उद्योग तसेच पिण्यासाठी वापरता यावे म्हणून अंदाजे शंभर मीटर रुंद व ३८८ कि.मी. लांब मुख्य कालवा तयार करण्यात येईल. मुख्य कालव्याला जोडून ५० धरणांमध्ये साठवण, ३२ उपसा योजना आणि आठ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यांमध्ये उपकालवे असतील. मुख्य कालव्यात १३ बोगदे असतील व त्यांची एकूण लांबी २० कि.मी.पेक्षा अधिक असेल.

 

गोसीखुर्द व नळगंगा यांच्यासह सैकी, मकरधोकडा, पांढराबोडी, जावली, लोअर वणा, बोर, धाम महाकाली, सुकळी, लोअर वर्धा, अपर वर्धा, बेंबळा, घोटा, हातोला, काटेपूर्णा, मन अशा सध्या अस्तित्वात असलेल्या अठरा धरणांचा वापर साठवणीसाठी होणार आहे. यापैकी दहा धरणांची उंची वाढवून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याची योजना आहे. याशिवाय ३२ नवीन धरणे बांधली जाणार आहेत. विदर्भाचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे ४ लक्ष ०४ हजार २८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परिणामी या भागातील शेतकरी दुबार वा तिबार पिके घेऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेलच शिवाय या प्रकल्पात १५१.२० दशलक्ष घ.मी. पाणी उद्योगांसाठी राखीव असल्याने उद्योग विकासालाही चालना मिळेल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. या प्रकल्पात निम्न वर्धा, काटेपूर्णा, नळगंगा हे तीन प्रकल्प बॅलन्सिंग रिझरवायर म्हणून वापरण्यात येतील. त्यामुळे पाण्याचे वर्षभराचे नियोजन करता येईल.

 

 

या प्रकल्पामुळे ४ लक्ष ०४ हजार २८१ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येईल. त्यात गोसीखुर्द ते धारगाव ११८९० हे., गोसीखुर्द ते निम्न वर्धा १,६६,०४१ हे., निम्न वर्धा ते काटेपूर्णा १,४५,०३९ हे. व काटेपूर्णा ते नळगंगा ८१३११ हेक्टर असे क्षेत्र असेल. भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रामुख्याने लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील घरगुती व औद्योगिक पाणी वापराचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

 

हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन विदर्भ एक संपन्न प्रदेश अशी ओळख निर्माण करण्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वप्न आहे. फक्त दोन नद्या जोडणे आणि इकडले पाणी तिकडे नेणे एव्हढ्यापुरताच हा प्रकल्प मर्यादित नाही, तर सिंचन क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प साऱ्या देशासाठीच आदर्श वाटावा असा आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या