‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

 


‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

 

बुलढाणा, दि. १८ (जिमाका) : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्ह्यात ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, नागरिक, अधिकारी-कर्मचारी, खेळाडू तसेच विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही या उपक्रमाची थीम असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्यात येणार आहे.

 

 ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’ अंतर्गत जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी सहभागी नागरिकांकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे. पाण्याचे महत्त्व, पावसाच्या पाण्याचे संधारण, जलस्रोतांचे संवर्धन आणि मातीचे संरक्षण याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

 

पाणी ही केवळ भविष्यातील गरज नसून आजच्या विकासाचीही मूलभूत गरज आहे. त्यामुळे जलसंधारणाचा संदेश केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता प्रत्येक गाव, शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिल्या. जलसंधारणाबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ ही स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.

 

२१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वॉकेथॉनमध्ये प्रशासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, नामांकित व प्रतिष्ठित व्यक्ती, खेळाडू, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिल्या. वॉकेथॉनच्या मार्गावर सहभागींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वाहतूक, सुरक्षा व आरोग्यविषयक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

 

शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रम, शपथ, पदयात्रा आणि जलसंवर्धनाशी संबंधित कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल जाधव यांनी उपक्रमाची माहिती देताना जिल्ह्यातील सर्व घटकांच्या सहभागातून हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जलसंधारणाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून ‘पाणी वाचवा, माती वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा’ या संकल्पनेला लोकचळवळीचे रूप देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या